Sunday, March 26, 2023

लॉक डाऊन - Lock down

Kahani lock down लॉक डाऊन

 कहाणी - लॉक डाऊन

*"लॉक डाऊन - Lock down"*

ह्रदयस्पर्शी कहाणी

लेखक - मनोज इंगळे, अकोला 


             दिवसा मागून दिवस निघत चालले होते आणि भैरु ची चिंता दिवसा गणीक तीळ तीळ वाढत चालली होती. भैरूच्याघ रामध्ये एकूण तो धरून सहा सदस्य होते भैरू, त्याची पत्नी पार्वती रत्नमाला, रुख्मीना आणि लता या तीन मुलीतर एक छोटा मुलगा विलास. एकंदरित सर्व कुटुंबाची जबाबदारी ही एकट्या भैरु वरच होती. 

          मिणमिणत्या कंदीलाची वात ही त्यातील तेल संपल्यामुळे अधिक धूर सोडत होती आणि वरील काच हा काळा होत चालला होता. जसे त्या दिव्याचे थोडे थोडे करून अस्तित्व संपत चालले होते असच काहीस भैरुला ही आपल्या कडे पाहताना असेच वाटत होते. पोटाची आग आणि मुलांची रडारड त्याला सहवत नव्हती. तेवढ्यातच एक पोलिसांच्या गाडीचा सायरन आवाज करत भैरुच्या कानाचे पडदे भेदत मनाच्या काचाचे तुकडे तुकडे करत होता.

.." कुणीही बाहेर निघू नका कारोना मुळे बाहेर फिरण्यास बंदी घातलेली आहे....!"

         भैरुला मात्र हे सर्व आता सहन होत नव्हते. कारण मागील चार ते पाच महिन्या पासून त्याच्या व त्याच्या पत्नीच्या गाठीला असलेली सर्व जमा रक्कम कधीचीच आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह करण्यात त्याची खर्ची गेलेली होती. आता पुढे काय करायचे याचा यक्ष प्रश्न त्याचे डोके पोखरत होता. भैरु हा त्याच्या जीवनात जेमतेम कमाई करून जेथे मिळेल तिथे पाल ठोकून कधी मात काम तर कधी हमाली असे हाताला जो मिळेल ते काम करायचा, वर त्याच्यावर त्याच्या परिवाराचा भार आणि लग्नाला आलेल्या मुली. असे सर्वच बाजूंच्या विचारांची गुतागुंत त्याच्या मनात चालली होती.

         सकाळी उठताक्षणी त्याच्या मनात एकच विचार चमकून गेला. मागील काही दिवसा पासून आपण काहीही आपल्या परिवाराला देऊ शकलो नाही. निदान काही आज तरी खण्याकरिता आणण्याचा प्रयत्न करू.... त्याच विचाराने आपल्या झोपडी मधून प्लॅस्टिकच्या ठीगळणी बनविलेले दार त्याने लोटले... आणि रस्त्याच्या दिशेने तो चालायला लागला. सकाळचा वेळ होता २ ला लॉक डाऊन लागणार होते..... साहेब मी खूप दिवसा पासून काही खाल्ले नाही हो काही तरी द्या की ...! या केविलवाण्या स्वराकडे एका भल्यामोठ्या पोट असलेल्या व्यक्तीने बघितले... काय रे या करोणा काळात आम्हालाच तर वांदेरे झाले. आता तुला कुठून देऊ... चल काही काम कर जा तिकडे...! अस म्हणत त्याने मोठे मोठे डोळे वटारत त्याने त्याला बाजूला सारले... भैरूच्या डोळ्यात पाणी आले... त्याला भाजी बाजारात जावेसे वाटले त्याला उमेद होती की तेथे तरी काही खायचं जरूर मिळेल. 

                घ्या भाऊ ताजे फळे आंबे घ्या अंशी रुपये किलो, टमाटे घ्या टमाटे... चवडी घ्या चवडी... असे अनेक आवाजना तो भेदत फळवल्या कडे आला... दादा आंबे द्या ना हो.... ये भिकाऱ्या होय की रे तिकडे.... दादा द्या ना हो एक तरी.... बाजूने एक सफारी घालून तोंडाला मास्क लावून माणूस आला आणि म्हणाला... कारे.... ओ... फळवाल्या... लेका करोना पसरविण्याचे मशीन घेऊन फिरतोय काय...! कोण घेणार तुझी फळे.... अस म्हणत रागाने त्याच्या कडे पाहत निघून गेला....

फळवाल्याने आपले नियंत्रण सोडले आणि भैरूला दोन ठेऊन दिले आणि दूर ढकलत म्हणाला.

 हरामखोर....पहिलेच धंदा पाणी नाही... त्यात हे लॉक डाऊन आणि त्यात हे पोलिस... त्यात तू ही आलास मारायला जा इथून......

       भैरुला लोटल्या मुळे चांगलेच खरचटले होते रक्त वाहत होते डोळ्यांच्या दुथड्या भरून वाहू लागल्या. भैरुने ठरवले की मास्क जरुरी आहे नाही तर पोलिस आणि लोक आपल्याला जगु देणार नाही ...म्हणून आपल्या जवळील मळका शेला त्याने तोंडाला गुंडाळला आणि भाजी बाजारातील सडका भाजीपाला जेथे फेकतात तेथे जाऊन काही टमाटे आणि भाजीचे नामशेष राहिलेले अवशेष निवडू लागला.

               घरी पोहताच त्याची पत्नी, रुखमी,रत्नी, लता,आणि विलास उत्साहाने त्याने हातात आणलेल्या कॅरी बॅग कडे पाहत होते... बाबा काय आणल तुमि ...भैरु त्यांच्याकडे पाहत ती बॅग त्यांच्या समोर करतो सगळे त्याकडे एखादे कुत्रे ज्याला खूप दिवसापासून काही खायला न दिल्यावर जसे झपटून पडतात तसेच सर्वांनी केले... सडलेला भाजीपाला त्यांनी जसा हाती पडेल तसा खाल्ला ...हे सर्व पाहून भैरु धाय मारून रडायला लागला.... भैरुची पत्नी त्याच्याकडे येऊन त्याला बिलगून रडू लागली आणि आपल्या पदराने त्याचे अश्रू पुसू लागली.... पार्वते हे कोणते दिवस आले व... म्ह्या कुणापुढे कधी हात पसरले न्हाई ...पण आज याच हातानं भिक मांगली... त्याचा हा टाहो फोडताना आणि रडताना पाहून भैरुची पत्नी म्हणाली....... धनी नका रडू अस.... तुमच्या मुळेच आम्ही समदे जगून राहिलो...तुम्हीच अस कर्सान तर कस व्हयीन... सांगा...

               भैरु दुसऱ्या दिवसाची वाट पाहत होता की, उद्या तरी काही आणावं आपल्या पिल्लान करिता...सकाळीच टालवाला महादेव अन्ना आला 

भैरु... ओ ... भैरु ....काय अण्णा बोला की.. अरे काही नाही सिंधी कॉलनी मध्ये एक घराचं काम चालू हाय सेंट्रिंगच्या तराफा न्यायच्या हायत नेशील का दोनशे देईल पण चोरून न्याव लगतीन बघ...पहीलेच सांगतो छकडागाडी मायी घेऊन जाजो लेका.... भैरुला ही चालून आलेली संधी गमवायची नव्हतीच त्याने लगेच होकार दिला...

          भैरुने गाडी घेतली आणि छकडचे पैडल मारत मारत गल्ल्या बोळ्यातून पोलिसांच्या नजरेतून वाचून आपली गाडी चालवू लागला. दम लागत असल्याने आणि चढ आल्याने त्याने तोंडाचा शेला काढला, सोबत विल्या त्याचा मुलगाही होता....थकून भैरू आपल्या मुलाला म्हणाला... वील्या डोळ्यात चांन्या चमकाव आणि काळोख यावा तसच होते रे... तेव्हा विल्याने आपल्या वडिलांच्या कडे बघतच तो खूप थकलेला असल्यासारखा त्याला जाणवला आणि विल्या स्वतःच म्हणतो ..... बाबा मी मारु का पैडल ... पण भैरू तोंडावरच घाम पुसत त्याला म्हणतो.,...  नाही रे.... माझ्या लेक्रा, तु फक्त ढकल मागुन... तेवढ्यात पोलिसांची गाडी समोर येते आणि भैरु स्तब्ध उभा राहतो.

            समोरून येणारी पोलिसांची गाडी ही भैरूच्या हृदयाच्या चिंध्या चिंध्या करणारी व त्यांच्या आशा वर पाणी फिरणारी ठरली. गाडीचे जोरदार ब्रेक लागून गाडी  भैरूच्या समोर येऊन उभी राहिली. त्यामधून एक भला मोठे पोट असलेला हवालदार काठी घेऊन बाहेर आला. त्याच्या पाठो पाठ इतर पोलीस कर्मचारी ही बाहेर आले. 

            डोळ्यात सर्व रक्त उतरवून आणि चेहरा आवेशाने लाल करत भैरूला म्हणाला..... कारे हरामखोरां इकडे सरकार तुमच्या भल्यासाठी बंद ठेवते आणि तुम्ही चोरून काळा बाजार करता... दे याले चांगला चोप रे... तेबी बिना मास्क आणि लहान पोरा कडून बी बालमजुरी करून घेतो नाही... भैरु काही बोलायच्या आत त्याला चारही बाजूंनी पोलिसांनी बेतानी मार मार मारले डोक्यावरील लागलेल्या वाराने व सततच्या होणाऱ्या काठ्यांच्या प्रहाराने भैरु खाली कोसळला... 

बाबा.... बाबा.... करत विल्या भैरुच्या अंगावर पडून रडू लागला... मारु नका हो माया बाबा ले... ओ सायेब नका मारु हो... 

     उतारावरगाडी असल्याने तिचा तोल मागे गेला आणि ती उतारावर जाऊन कोसळली.  ते सरळ एका  एका बंगल्याचे दार तोडून आत जाई पर्यंत...भैरु रस्त्यावर पडला होता आणि कोणतीच हालचाल करत नव्हता.. पोलिसांना वाटले की, आता काही खर नाही.म्हणून त्यांनी कुणी यायच्या आधीच तेथून पळ काढला... विल्या जोरजोराने भैरुच्या निष्क्रिय शरीरावर हात ठेऊन त्याच्या तोंडावरून हात फिरवत रडत होता...बाबा ....बाबा... बाबा उठा ना कोणी वाचवा ना हो माया बाबाले........घरचे सर्वच भैरु घरी आज जरूर काही खायला घेऊन येणार म्हणून दारावर वाट पाहत होते.


समाप्त...








No comments:

Post a Comment